Quantcast
Channel: Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Viewing all 172726 articles
Browse latest View live

मंत्रालयात सामान्यांना प्रवेश करण्यास बंदी

$
0
0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: 'करोना'चा फैलाव टाळण्यासाठी मंत्रालयात सामान्य लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून, बाहेरून येणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सरकारी बैठकांवरही निर्बंध घालण्यात आले असून, गृह विभागाने याबाबतचा आदेश सोमवारी जारी केला. सामान्य लोकांना मंत्रालयात प्रवेश देणारी यंत्रणाच बंद करण्यात आली आहे. मंत्री किंवा राज्यमंत्री यांनी पत्र दिले तर त्यांच्याकडे दरदिवशी जास्तीत जास्त दहा लोकांना प्रवेश दिला जाईल, तर मुख्य सचिव किंवा सचिवांकडे पाच लोकांना प्रवेश दिला जाईल. परंतु, या प्रवेशार्थींची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना आत सोडले जाणार आहे. मुंबईबाहेरील सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही मंत्रालयात प्रवेश बंद असेल. गृह विभागाने ज्यांना एक वर्षाचे तात्पुरते प्रवेशपत्र दिले आहेत, त्यांचे कार्यालय मुंबईत असेल तरच त्यांना मंत्रालयात प्रवेश मिळेल. मंत्री, राज्यमंत्री व सचिव यांनी तातडीची गरज असेल तरच बैठका घ्याव्यात. बैठकीसाठी बाहेरील अधिकारी, कर्मचारी व खासगी व्यक्ती यांना मंत्रालयात बोलवू नये, असे या आदेशात नमूद केले आहे. हजेरीसाठी मंत्रालयात कार्यरत असलेली बायोमेट्रिक प्रणालीसुद्धा बंद करावी. त्याऐवजी त्या त्या खात्याने मस्टरवर हजेरीची नोंद ठेवावी, असे या आदेशात म्हटले आहे.

करोना प्रतिरोधक गादीची जाहिरात अखेर मागे

$
0
0
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: 'करोनावर गुणकारी असलेली 'गादी', अशी जाहिरात करणाऱ्या कंपनीला मुंबई ग्राहक पंचायतकडून चपराक बसली आहे. अशा जाहिरातीविरोधात पंचायतने तक्रार करताच संबंधित कंपनीला ही जाहिरात मागे घ्यावी लागली. 'करोना'मुळे सध्या सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. हा नेमका आजार काय व त्यावर उपचार काय, याबाबत सर्वसामान्यांमध्ये तणावाचे वातावरण असतानाच अरिहंत मॅट्रेसेस प्रायव्हेट लिमिटेडने एका वृत्तपत्रात अलिकडेच करोनाविरोधी गादी विक्रीला असल्याची जाहिरात दिली होती. '१५ हजार रुपये किमतीची ही गादी खरेदी केल्यास व त्यावर झोपल्यास करोना दूर होईल', असा दावा त्या जाहिरातीत करण्यात आला. याविरुद्ध मुंबई ग्राहक पंचायतच्या डॉ. अर्चना सबनीस यांनी भारतीय जाहिरात मानांकन परिषदेकडे (एएससीआय) तक्रार केली. त्यानंतर कंपनीने ही जाहिरात मागे घेतली. कंपनीने 'एएससीआय'च्या सरचिटणीसांशी संपर्क साधून जाहिरात मागे घेत असल्याचे सांगितले. तसेच अशी जाहिरात पुन्हा दिसल्यास निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन 'एएससीआय'ने ग्राहक पंचायतीला केले आहे. 'करोनाच्या साथीमुळे सर्वसामान्य भयभीत झाले आहेत. ग्राहकांची ही मानसिकता ओळखून स्वत:च उखळ पांढरे करण्याचा हा डाव होता. तो पंचायतीचे हाणून पाडला', असे ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले.

‘करोना’ग्रस्त ज्येष्ठ महिलेची चाचणी निगेटिव्ह

$
0
0
sharmila.kalgutkar@timesgroup.com मुंबई: करोना विषाणूच्या संसर्गावर अद्याप कोणत्याही प्रकारची लस वा ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे लागण झाली तर काय करायचे या शंकेने धास्तावलेल्या मुंबईकरांसाठी दिलासा ठरणारी माहिती हाती आली आहे. करोनाची लागण झाल्याने कस्तुरबा रुग्णालयात दाखल ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेची चार दिवसांनी पुन्हा करण्यात आलेली चाचणी निगेटिव्ह आली आहे. या महिलेला अद्याप रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले नाही. पुन्हा चार दिवसांनी त्यांची चाचणी पुन्हा करण्यात येईल. मात्र, या महत्त्वाच्या निदानामुळे रोगप्रतिकारशक्ती सक्षम ठेवली तर करोनाचा धोका टळू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. कस्तुरबा रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खात्रीलायकरित्या दिलेल्या माहितीनुसार ही ज्येष्ठ महिला एका खासगी टूर कंपनीसोबत दुबई येथे त्यांच्या पतीसोबत फिरायला गेली होती. तेथून आल्यानंतर या ग्रुपमध्ये संशयित म्हणून या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चाचण्यांमध्ये दोघांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सोमवारी चार दिवसांनी करोनाच्या चाचण्या पुन्हा केल्यानंतर हे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 'करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी. मात्र स्वच्छतेचे निकष, सकारात्मक मानसिकता आणि पोषक आहार ठेवला तर या आजारावर मात करणे शक्य आहे. ज्येष्ठ नागरिकांना हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव तातडीने होतो', असे या संदर्भात बोलताना कस्तुरबातील डॉक्टरांनी सांगितले. या ६९ वर्षीय महिलेने स्वतःची काळजी व्यवस्थित घेतली, त्यांना वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केले. वैशिष्टपूर्ण औषधे वा उपचारपद्धती त्यांना देण्यात आली नाही, मात्र लक्षणांवरील उपचार कस्तुरबामध्ये सुरू होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या हिंमत हारल्या नाहीत. त्यांच्या पतीचे अहवाल अद्याप निगेटिव्ह आलेले नाहीत, त्यांचीही दोन दिवसांत पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले. या महिलेचा विलगीकरणाचा काळ पूर्ण न झाल्याने त्यांना रुग्णालयांमधून घरी सोडण्यात आलेले नाही. अजून दोन तपासण्या पुन्हा निश्चित निदान करण्यासाठी करण्यात येणार आहेत. मात्र या निदानामुळे करोनाच्या संदर्भात असलेली भीती दूर होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास डॉक्टरांनीही व्यक्त केला आहे. एक हजार लोकांचे विलगीकरण पालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये एक हजार लोकांना घरामध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा तीव्र त्रास होत नसला तरीही त्यांना असलेली सौम्य स्वरूपाची लक्षणे लक्षात घेता घरामध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पालिकेने दिलेल्या निर्देशांचे पालन करत असाल तर घरी राहता येणार आहे. आज, मंगळवारी सकाळी बाहेरून येणाऱ्या बहुतांश विमानांमधून संशयित प्रवाशांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यांना विमानतळावरील हॉटेलमध्ये थांबवण्यात येणार असून पालिकेने तेथेही व्यवस्था असावी यासाठी संबधित चार हॉटेलांना तसे निर्देश दिले आहेत.

येस बँक व्यवहार उद्यापासून सुरळीत होणार

$
0
0
वृत्तसंस्था, नवी दिल्ली: येस बँकेचे ग्राहक उद्या, बुधवारपासून सर्व बँकिंग व्यवहार करू शकतील, असे बँकेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. १८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून संपूर्ण बँकिंग सेवा ग्राहकांना दिली जाईल. ग्राहकांनी गुरुवारपासून बँकेच्या नेहमीच्या कालावधीत व्यवहार करावेत. बँकेच्या डिजिटल बँकिंग सेवा व मंच यांचाही ग्राहकांना वापर करता येणार आहे. निफ्टी ठरवणाऱ्या ५० कंपन्यांमधून येस बँकेचे नाव १९ मार्चपासून वगळले जाणार आहे. आर्थिक संकटात येस बँक सापडल्यामुळे अनेक बँकांनी तिच्यात गुंतवणूक केली आहे. मात्र ही गुंतवणूक केवळ बँकेला आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठीच करण्यात आली आहे, असे भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले आहे. शेअर बाजार पुन्हा कोसळले करोना विषाणूचा वाढणारा प्रादुर्भाव आणि फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या कपातीनंतर सोमवारी देशांतर्गत बाजारांत मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. सत्रांतर्गत व्यवहारांच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २,७१३.४१ अंकांनी घसरून ३१,३९०.०७च्या पातळीवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७५६.१० अंकांनी घसरून ९,१९९.१०च्या पातळीवर गेला. अनिल अंबानी, चंद्रा यांना 'ईडी'चे समन्स येस बँक घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी, सुभाष चंद्रा, नरेश गोयल यांना समन्स जारी केले. अनिल अंबानी यांच्या समूहाने जवळपास १२ हजार ८०८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवले व त्यात परदेशी रकमेचा दुरुपयोग झाल्याचा ईडीचा संशय आहे.

करोनाः परीक्षांच्या प्रश्नावर आज पुन्हा सुनावणी

$
0
0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: 'करोना'च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने योजलेले उपाय आणि सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था व त्यांच्या परीक्षा इत्यादी मुद्द्यांबाबत आज, मंगळवारी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 'करोना'चा फैलाव रोखण्यासाठीच्या उपायांतील त्रुटी निदर्शनास आणणारी जनहित याचिका सागर जोंधळे यांनी अॅड. मिलिंद देशमुख यांच्यामार्फत केली आहे. याविषयी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सोमवारी प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी 'सर्व शाळा-कॉलेजे, सिनेमा-नाट्यगृहे, मॉल इत्यादी बंद करण्यासह सर्व प्रकारच्या उपायांची सरकारने यापूर्वीच अंमलबजावणी केली आहे. सरकार या समस्येविषयी अत्यंत गंभीर आहे', अशी माहिती मुख्य सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी दिली. तेव्हा, 'सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे निर्देश दिले असले तरी दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षा व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकललेल्या नाहीत', असे अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी हस्तक्षेप अर्जाद्वारे खंडपीठाच्या निदर्शनास आणले. तेव्हा, 'यासंदर्भात सरकारकडून माहिती घेऊन तपशील सादर करू', असे काकडे यांनी सांगितले. त्यामुळे खंडपीठाने याविषयीची पुढील सुनावणी आज, मंगळवारी ठेवली. दरम्यान, याचिकादारांतर्फे अॅड. देशमुख यांनी यावेळी सरकारला विविध प्रकारचे १७ उपाय सुचवले. आणखी एक जनहित याचिका 'करोना'च्या प्रश्नावर पुण्यातील वकील अॅड. सागर सूर्यवंशी यांनीही अॅड. सागर कुर्सीजा यांच्यामार्फत जनहित याचिका केली असून तीही आज, मंगळवारी सुनावणीस येईल.

महामुंबईत करोनाचे १४ रुग्ण, कस्तुरबामध्ये उपचार सुरू

$
0
0
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह राज्यभरात करोनाची भीती वाढत असतानाच शनिवारी कोरोनाची लागण झालेल्या कल्याणमधील एका रुग्णाची पत्नी (३७) आणि तिच्या तीन वर्षीय मुलीलाही या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तसेच भांडुपमधील एक आणि नवी मुंबईतील दोन रुग्णांनाही करोनाची लागण झाल्याचे निदान सोमवारी झाले. त्यामुळे महामुंबईतील एकूण करोना रुग्णांची संख्या १४वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईचे सहा तर मुंबईबाहेरच्या आठ रुग्णांचा समावेश आहे. १८ जानेवारीपासून आत्तापर्यंत २ लाख ४६ हजार ८४३ प्रवाशांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये करोना संशयित असलेल्या ४९८ रुग्णांची पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात चाचणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये ४५२ जणांना करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील सहा आणि मुंबईबाहेरील आठ जण करोना 'पॉझिटिव्ह' आढळले आहेत. यामध्ये रविवारी तपासणी झालेल्या संशयितांचे हवाल सोमवारी आले असून भांडुपमधील एक, कल्याणचे दोन आणि नवी मुंबईतील दोन संशयितांच्या चाचण्या 'पॉझेटिव्ह' आल्या आहेत. नवी मुंबईतील दोन रुग्ण ४२ आणि ४७ वर्षीय असून हे रुग्ण १४ मार्च रोजी निदान झालेल्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आले होते. भांडुपचा रुग्ण पोर्तुगाल येथून १३ मार्च रोजी मुंबईत आला होता. सोमवारी सायंकाळी ६.३० पर्यंत आलेल्या करोना संशयितांच्या २० पैकी २० चाचण्या निगेटिव्ह' आल्या असून २४ जणांच्या चाचण्यांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. 'कस्तुरबा'त ६५ जणांवर उपचार कस्तुरबा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये आत्तापर्यंत १८६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ४३३ संशयितांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. तर कस्तुरबात एकूण ६५ रुग्णांवर जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. शाह यांनी दिली. समिती स्थापन करोनाच्या लक्षणांवरून पालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून रुग्णांची विभागणी करण्यासाठी 'रिस्क प्रोफाईल कमिटी'ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये तीव्र लक्षणे असलेल्या 'अ' श्रेणीतील रुणांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 'ब' श्रेणीतील सौम्य लक्षणे दिसलेल्या रुग्णांना अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. करोनाची लागण झालेल्या देशांतून प्रवास करून आलेल्या आणि अत्यंत सौम्य लक्षणे दिसलेल्या संशयितांना घरी पाठवण्यात येत असून त्यांच्यावरदेखील देखरेख ठेवण्याचे काम पालिकेच्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. 'सेव्हन हिल्स'मध्ये २४ डॉक्टरांची टीम पालिकेच्या अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी २४ डॉक्टर आणि आवश्यक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी आठ डॉक्टर २४ तास ड्युटीवर आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयात सध्या ११ संशयितांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. घरातही करता येईल विलगीकरण आपल्या घरातील स्वतंत्र खोलीतही विलगीकरण करता येईल. रुग्णाचा १४ दिवस कुणाशी संपर्कात येऊ नये. या खोलीत स्वतंत्र टॉयलेट-बाथरूम आवश्यक असून या खोलीचे निर्जंतुकीकरण खूपच आवश्यक आहे. रुग्णाला खाद्यपदार्थ काही अंतरावरून दिले जावेत. ज्या रुग्णाबाबत करोनाची लागण झाल्याची शंका आहे, पण सध्या तरी रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही, अशी व्यक्तीच स्वतःच घरीच विलगीकरण करू शकते. मात्र काही दिवसांनी लक्षणे जाणवू लागल्यास तत्काळ पालिकेच्या आरोग्य खात्याकडे संपर्क साधावा, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. खासगी रूग्णालयासाठी मुभा ज्या रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल व्हायचे आहे, त्यांना तशी मुभा देण्यात आली आहे.

न झालेल्या करोनाचा त्याला झाला मन:स्ताप

$
0
0
मिलिंद पांगिरेकर, गारगोटी: दुबईमध्ये करोनाचा कहर वाढल्यानंतर मी गावी येण्याचा निर्णय घेतला. तेथे करोना संदर्भातील सर्व तपासण्या झाल्या. पुणे विमानतळावर तपासणी, चौकशीनंतर बसमधून पुणे-बेळगाव बसमधून कोल्हापुरात आलो. सीबीएसवरून गारगोटीला जायला बसमध्ये बसलो. मात्र, प्रवासी, वाहकामुळे इस्पुर्लीत बस थांबवून मला तेथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील तपासणीनंतर पुन्ही कोल्हापूरमध्ये सीपीआरमध्ये तपासणी झाली. अशा प्रचंड वेळखाऊ घडामोडींनंतर मी घरी परतलो. न झालेल्या 'करोना'चा मन:स्ताप सोसावा लागल्याची खंत पुष्पनगर (भुदरगड) येथील दुबईहून आलेल्या प्रवाशाने व्यक्त केली आहे. प्रवाशांनी इस्पुर्ली येथे गारगोटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास भाग पाडले होते. संबंधित प्रवाशाची करोनाची तपासणी होऊन निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे. मात्र, प्रशासन आजही त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. 'मी नोकरीच्या निमित्ताने २०१३ साली कुवेतला गेलो. २०१४ पासून आजअखेर, गेली सहा वर्षे दुबईत खाद्यपदार्थाच्या कंपनीत काम करतो. दुबईमध्ये करोनाचा कहर वाढल्यानंतर मी गावी येण्याचा निर्णय घेतला. दुबईत करोना संदर्भातील सर्व तपासण्या झाल्या. मी माझ्या रुममधून बाहेर पडतानाच मास्क, ग्लोज, कॅप, बूट कव्हर, लगेज कव्हर असे साहित्य घेतले होते. गुरुवारी मध्यरात्री विमान प्रवास सुरू झाला. सव्वाचार तासांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचलो. विमानतळावर उतरण्यापूर्वीच आम्हाला विमानात एक फॉर्म देण्यात आला होता. फॉर्ममध्ये फ्लाइट, सीट, पासपोर्ट क्रमांकासह कोठून आला, कोठे जाणार, कोणता आजार आहे का? याची सर्व माहिती भरून घेण्यात आली होती. पुणे विमानतळावर वैद्यकीय पथकाने तपासणी केली. नंतर विमानात विचारलेल्या प्रश्नांची पुन्हा सरबत्ती केली. पथकाने तपासणीनंतर गावी पोहोचल्यानंतर १४ दिवस घर सोडू नका अशी सूचना देऊन मला सोडले. पुण्यात राहणाऱ्या भावास मी येणार असल्याची कल्पना दिली होती. तो मला नेण्यासाठी विमानतळावर आला. त्याने मला स्वारगेट स्थानकापर्यंत सोडले. तेथे कर्नाटक महामंडळाची पुणे-बेळगाव एस. टी. बस मिळाली' असे संबंधीत प्रवाशांनी सांगितले. 'सकाळी ११ वाजता कोल्हापूर बसस्थानकावर पोहचलो. मास्क वगैरे घातल्याने अधिकाऱ्यांनी तेथेही माझी चौकशी झाली. मी दुबईहून आल्याचे सांगून करोना संदर्भात संपूर्ण तपासण्या झाल्याचे सांगितले. नंतर पुन्हा मास्क बदलून ११.३०च्या कोल्हापूर-गारगोटी बसमध्ये बसलो. बसमध्ये वाहकाने चौकशीस सुरुवात केली. प्रश्नांची सरबत्ती केली. बसमध्ये बसलेले दोघे प्रवाशी सीबीएसवरच उतरले. मी गारगोटीचे तिकीट काढले. बस संभाजीनगर स्टँडवर आली असता तेथील एसटीच्या अधिकाऱ्यांनी मला गाडीतून उतरण्यास सांगितले. पण, मी तिकीट काढले आहे, उतरणार नाही असे सांगितले. त्यावेळी सीबीएस येथे बसमधून उतरलेल्या प्रवाशांनी नियंत्रण कक्ष तसेच अधिकाऱ्यांना कळविल्यामुळे त्यांनी संभाजीनगर येथे चौकशी करून उतरवण्यास सांगितल्याचे समजले. नंतर गाडी गारगोटीकडे निघाली. पण, इस्फुर्लीजवळ पोलिसांनी गाडी थांबविली. मला गाडीतून उतरण्यास सांगितले. नकार दिल्यानंतर मला जबरदस्तीने खाली उतरवून अॅम्ब्यलन्समध्ये बसविले. इस्पुर्लीत प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक तपासणी करून पुढील तपासणीसाठी सीपीआरमध्ये नेण्यात आले. तेथे तपासणी करून मला सोडण्यात आले. माझ्याबद्दल कंट्रोल रूमला कळविल्यामुळे पोलिसांनी इस्पुर्लीत नाकाबंदी केली होती' असे संबंधीत प्रवाशांनी सांगितले. टेस्ट निगेटिव्ह तरीही... 'वास्तविक करोनाची टेस्ट निगेटिव्ह होती. याबाबत मी सांगत असतानाही एसटीचे कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, पोलिसांनी विनाकारण त्रास दिला. या गोंधळात दुपारी ३.४५ वाजता गावी पोहचलो. मी घरी पोहोचण्यापूर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी घरी आले होते. त्यांनीही प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर आजही आरोग्य यंत्रणा दररोज लक्ष ठेवत आहे' असे संबंधित प्रवाशांनी सांगितले.

मास्क, सॅनिटायझर्स विक्रीत गुटखाकिंग?

$
0
0
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः करोनाची संधी साधत एकीकडे विक्रेते आणि उत्पादकांनी मास्क आणि सॅनिटायझरची चढ्या दराने विक्री सुरू केली असतानाच, या व्यवसायात आता गुटखा विक्रेतेही उतरले आहेत. त्यांच्याकडून गुजरात आणि मध्य प्रदेशातून अवैधपणे बनावट मास्क आणि सॅनिटायझर्सची विक्री केली जात असल्याचा दावा नाशिक केमिस्ट असोसिएशनने अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेद्र शिंगणे यांच्यासमोर केला. संघटनेचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनीच हा दावा केला असून, डॉ. शिंगणे यांनी तातडीने संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वीच बनावट सॅनिटायझरचा दीड लाखाचा साठा आढळला होता. मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर डॉ. शिंगणे यांनी सोमवारी (दि. १६) नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील मास्क व सॅनिटायझरचे मुख्य वितरक व उत्पादकांची तातडीने बैठक बोलावली. बैठकीत जिल्ह्यातील मास्क आणि सॅनिटायझरच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी करोनाच्या संधीचा फायदा उचलण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असल्याचे उत्पादकांनीच यावेळी सांगितले. मास्कच्या किमती निश्चित नसल्याने त्यांची चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे केमिस्ट असोसिएशनने यावेळी मान्य केले. विशेष म्हणजे मास्क आणि सॅनिटायझर आता मेडिकलमध्येच नव्हे तर, गल्लोल्ली किराणा दुकानांमध्येही मास्क विकले जात असून, यामागे गुटखा विक्रेत्यांची लॉबी सक्रिय झाल्याचा आरोप चौधरी यांनी मंत्र्यांसमोरच केला. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून निकृष्ट दर्जाचे मास्क आणि गुटखा विक्रेते शहरात मास्कची विक्री करीत असल्याचा आरोप त्यांनी मंत्र्यांसमोर केला. त्यामुळे डॉ. शिंगणे यांनीदेखील तातडीने यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले. या बैठकीला चौधरी यांच्यासह मिलिंद कटारिया, रमेश कांकरिया, अमित बच्छाव, रिजवान शेख, सुरेश पाटील, राजेंद्र धामणे आदी उपस्थित होते. ऑनलाइन औषधांबाबत लवकरच कायदा ऑनलाइन सॅनिटायझर, मास्क खरेदीदेखील वाढली असून, अशा प्रकारच्या वस्तू, औषधांच्या गुणवत्ता नियंत्रणाबाबत कोणतीच व्यवस्था नसल्याने त्याबाबत केंद्र सरकार लवकरच कायदा करणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारही त्यावर कायदा करण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच डॉ. शिंगणे यांनी केले. यासंदर्भात एका समितीची स्थापना करण्यात येणार असून, लवकरच त्याचे धोरण तयार केले जाणार असल्याचे शिंगणे म्हणाले. छाप्यांना बगल देण्याचा प्रयत्न? शहरातील औषध विक्रेतेच एकीकडे मास्क आणि सॅनिटायझरची विक्री करीत असताना, चौधरी यांनी या प्रकरणात थेट गुटखा विक्रेत्यांकडे बोट दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अन्न व औषध विभागाने एकीकडे विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली असताना असोसिएशनकडून गुटखा विक्रेत्यांचे नाव घेऊन त्यांच्याकडील कारवाईचा रोख कमी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, याचीही तपासणी आता विभाग करणार आहे. आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी हा आरोप करण्यात आल्याची शक्यताही व्यक्त केली जात असून, विभाग एकाच वेळी औषध विक्रेत्यांवर नजर ठेवून गुटखा विक्रेत्यांकडील साहित्यांवरही छापा टाकणार असल्याचे समजते.

शिर्डी साई मंदीर सुरूच; आरतीचे पास बंद

$
0
0
नगर : शिर्डीच्या साई समाधी मंदिरात गर्दी टाळण्याचा एक भाग म्हणून भाविकांना आरतीला उपस्थित राहण्यासाठी देण्यात येणारे पास बंद करण्यात आले आहेत. मात्र, दर्शनासाठीचे पास सुरूच राहतील आणि मंदीरही खुलेच राहणार आहे. 'करोना'चा संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात दररोज चार वेळा आरती होते. त्यावेळी उपस्थित राहण्यासाठी सशुल्क पास दिले जातात. याशिवाय संस्थानच्या जनसंपर्क विभागामार्फत व्हीआयपींना आरतीचे पास दिले जातात. हे सर्व पास सोमवारपासून बंद करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑनलाइन पास घेतलेल्यांना मात्र प्रवेश देण्यात येणार आहे.

राज्यातही एमपीसारखा राजकीय भूकंप!

$
0
0
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुतीत परत यावे', असे आवाहन करून, 'राज्यातही मध्य प्रदेशसारखा राजकीय भूकंप येऊ शकतो', अशी शक्यता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी सोमवारी पत्रपरिषदेत व्यक्त केली. 'ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात काम करत आहे. अनेक मुद्द्यांवर समझोता करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही असा अवमान सहन केला नसता. मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडीचे परिणाम महाराष्ट्रातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील सद्यस्थिती लक्षात घेता राजकीय भूकंप होऊ शकतो. त्यामुळे ठाकरे यांनी भाजपसोबत येण्याचा विचार करावा आणि नव्याने सरकार स्थापन करावे', असा सल्लाही आठवले यांनी दिला. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांची काँग्रेसमध्ये कुचंबणा झाली. ते स्वत:हून भाजपमध्ये आले. कोणत्याही पक्षात फोडाफाडी करण्याची भाजपला गरज नाही. याउलट गुजरात, राजस्थान, झारखंड व छत्तीसगड आदी राज्यांत इतर पक्षांच्या आमदारांना पक्षात आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न होत आहेत. मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली मुदत योग्य नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला अशीच संधी मिळाली असती तर, राज्यातील चित्र वेगळे राहिले असते, असा दावाही आठवले यांनी केला. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून राहुल गांधी स्वत:ची प्रतिमा खराब करत असल्याची टीकाही त्यांनी केली. पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, राजन वाघमारे, बाळू घरडे आदी उपस्थित होते. राऊत यांचे वक्तव्य अयोग्य! पालकमंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण समाजाच्या विरोधात नव्हते. त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत ब्राह्मणांनी साथ दिली. ब्राह्मण कन्येशी त्यांनी विवाह केला, माझी पत्नीदेखील ब्राह्मण आहे. आमचा ब्राह्मणवादास विरोध आहे, ब्राह्मणांना नाही. राऊत यांचे आक्षेपार्ह्य वक्तव्य योग्य नाही', असे आठवले म्हणाले. पुन्हा कविता... 'गो करोना' अशी घोषणा दिल्यानंतर त्याची टिंगलटवाळी करण्यात आली. करोना जाण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असले तरी, सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगून आठवले यांनी 'करोना गो का मैने दिया था नारा, इसलिए जाग गया था भारत सारा, करोना बहुत देश में चमक रहा हैं सारा, मैं एक दिन बजा दुँगा करोना के बारा' अशा कवितेच्या ओळी सादर केल्या.

कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर सुरूच राहणार

$
0
0
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: 'करोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील पर्यटक व स्थानिक भाविकांची संख्या प्रचंड घटली आहे. दरम्यान, दर्शनासाठी अंबाबाई मंदिर खुले राहणार असून २० पेक्षा जास्त भाविक रांगेत असतील तर एका वेळी २० भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे,' अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने सोमवारी दिला. या आदेशानुसार राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. अंबाबाई मंदिर बंद न करता भाविकांची संख्याच कमी असल्याने मंदिर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर सॅनीटायझर सुविधा देण्यात आली आहे. भाविकांनी मास्क लावून मंदिरात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

करोनावर खबरदारी; नागपुरात जमावबंदी

$
0
0
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: करोनावर खबरदारीचा उपाय म्हणून उपराजधानीत सोमवारी रात्रीपासून जमावबंदी लागू झाली. येत्या ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ती कायम राहणार आहे. नियम मोडल्यास एक ते सहा महिन्यांची शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी कलम १४४नुसार जमावबंदीचे आदेश सोमवारी सायंकाळी जारी केले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, व्यावसायिक प्रदर्शन व शिबिर, पर्यटन, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे, आंदोलन सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. यात एका ठिकाणी पाचहून अधिक नागरिकांनी राहू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही कदम यांनी दिला आहे. करोनाची लागण होऊ नये, यासाठी नागपूर पोलिसांनीही विशेष काळजी घेतली आहे. लग्नसमारंभ किंवा अंत्यविधी व त्यानंतर होणाऱ्या विधीसाठी हा आदेश लागू होणार नाही. यापूर्वी मॉल, जिम व चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. सोमवारी सकाळपासूनच पोलिसांनी चित्रपटगृहे, जिम, मॉल बंद आहेत किंवा नाही, याची झाडाझडती घेतली. याशिवाय लॉज व हॉटेल्सनाही विशेष काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. करोनाची लागण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून तसेच मानवी जीवितास निर्माण झालेली भीती, सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी व सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याने हे आदेश काढण्यात आले. महापालिकेच्या भूमिकेकडे लक्ष जमावबंदी आदेश लागू झाला असला तरी फूटपाथवरील चहाठेले, पानठेले व दुकानांमधील गर्दीमुळे धोका होऊ शकतो. मात्र, ही प्रतिष्ठाने बंद करणे किंवा दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला आहे. शहरात जमावबंदी आदेश लागू झाल्यानंतर आता महापालिका कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. मंदिरेही बंद जिल्हा प्रशासनानेही अधिक खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धार्मिक स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री १२ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत मंदिरे व अन्य धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी : पोलिस आयुक्त करोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक नागपूरकराने काळजी घेणे आवश्यक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी करण्यात आली आहे. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला आहे.

वृश्चिकः आरोग्याकडे दुर्लक्ष नको; आजचे भविष्य

$
0
0
- पं. डॉ. संदीप अवचट मेषः जिवलग मित्रमंडळींशी भेट होईल. आर्थिक बचत करण्याकडे कल राहील. जोडीदारासोबत कुरबूर होईल. वृषभः वाईट सवयींपासून दूर राहा. भावाला किंवा बहिणीला आर्थिक सहाय्य करावे लागेल. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे थकवा येईल. मिथुनः आवडत्या व्यक्तीचा दुरावा सहन करावा लागेल. प्रलंबित कामे भागीदाराच्या मदतीने पूर्ण कराल. परदेशी व्यवसायातील गुंतवणुक नफा मिळवून देईल. कर्कः पुरातन वस्तू किंवा दागदागिन्यांमधील गुंतवणुक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक सहलीचा आनंद लुटाल. सामाजिक कार्यात उल्लेखनिय कामगिरी कराल. सिंहः आज कुणालाही पैसे उधार देऊ नका. मेहनत केल्याशिवाय यश मिळणार नाही. माहेरच्या मंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. कन्याः उत्तम आरोग्यासाठी योगासने कराल. लहान मुलांसोबत दिवसातील काही वेळ व्यतीत कराल. व्यावसायिकांना अनपेक्षित फायदा होईल. तुळः व्यावसायात भागीदारांना गृहित धरू नका. आर्थिक गुंतवणुक करताना योजनांचा नीट अभ्यास करा. अनोळखी माणसे आपलेपणाने वागतील. वृश्चिकः परदेशात नोकरी करणाऱ्यांना धनलाभ होईल. जुन्या आठवणींमध्ये रमाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. धनूः नवे हितसंबंध जुळतील. कलेच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवाल. बक्षिसे मिळवाल. मकरः व्यायामाचे महत्त्व पटेल. जमाखर्चाचा ताळमेळ साधा. वैयक्तिक आयुष्यात आनंददायी घटना घडेल. कुंभः घरात तणावाचे प्रसंग उद्भवतील. व्यवसायाच्य दृष्टिने उत्तम दिवस. काही व्यक्ती एकांतात राहणे पसंत करतील. मीनः वैवाहीक आयुष्यातील एक उत्तम दिवस. संध्याकाळ मौजमजेत जाईल. धनलाभ होण्याची शक्यता.

मध्य प्रदेश: आज बहुमत चाचणी; कमळ फुलणार?

$
0
0
भोपाळ: मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला असून सरकार तरणार की गडगडणार हे पाहण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. काल विधानसभेत टाळण्याच्या विरोधात भाजपकडून दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार असून राज्यपाल लालजी टंडन यांच्या आदेशानुसार आज विधानसभेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. हे पाहता आज कमलनाथ सरकार टिकणार की १५ महिन्यांनंतर पुन्हा भाजपचे कमल फुलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणाव असे काल रात्री उशिरा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाकडे बहुमत असल्यामुळेच भारतीय जनता पक्ष बहुमत चाचणी घेण्यासाठी तयार नाही असे कमलनाथ म्हणाले. भारतीय जनता पक्ष बहुमत चाचणी टाळत असल्याचा आरोपच कमलनाथ यांनी केला आहे. कमलनाथ राज्यपालांच्या आदेशाकडे करणार दुर्लक्ष? मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी तीन वेळा कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ते आदेश कमलनाथ सरकार मानायला तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवारी पुन्हा मुख्यमंत्री कमलनाथ राजभवनात पोहोचले. ज्यांना असे वाटते की आमच्याकडे बहुमताचा आकडा नाही, त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा असे कमलनाथ राज्यपाल टंडन यांच्या भेटीनंतर म्हणाले. मी का बहुमत चाचणी द्यावी, असा प्रश्न उपस्थित करतानाच त्यांनी १६ आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले नसून त्यांनी समोर आले पाहिजे असेही म्हटले आहे. आपण राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेत ली असून त्यांना आपण राज्यघटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नाही असे सांगितल्याचे कमलनाथ म्हणाले. मी राज्यपालांना अभिभाषणाबाबत धन्यवाद देण्यासाठी गेलो होतो, असे कमलनाथ म्हणाले. राज्यपालांनी केवळ सभागृहाची कार्यवाही शांततेने करावे असे राज्यपालांचे म्हणणे असल्याचे ते पुढे म्हणाले. १५ महिन्यांनंतर फुलणार कमल? एकीकडे आमचे सरकार अल्पमतात नाही असे सांगत कमलनाथ हे बहुमत चाचणी घेणे टाळत आहेत, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष बहुमत चाचणीसाठी जोरदार प्रयत्नशील आहे. आज सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणी नंतर राज्यपालांचा आदेश महत्त्वाचा ठरणार की कमलनाथ सरकारचा निर्णय हे स्पष्ट होणार आहे. मात्र, जर बहुमत चाचणी घेण्यात आली तर कमलनाथ सरकार टिकणार नाही असे म्हटले जात आहे.

Live करोना: कर्नाटकात आणखी २ रुग्ण आढळले

$
0
0
देशभरात करोनाचे ११४ रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली होती. यातील १३ जणांना करोनामुक्त करण्यात आले आहे. ११४ जणांपैकी १७ जण विदेशी नागरिक आहेत. वाचा करोनासंदर्भातील अपडेट्स... > कर्नाटकमध्ये दोघांना करोना. चाचणी पॉझिटिव्ह आढळले. ब्रिटनमधून आलेल्या २० वर्षीय महिलेला लागण. तिच्या संपर्कात आलेल्या ६० वर्षीय व्यक्तीलाही करोना. दोघांवर कलबुर्गीत उपचार सुरू

Live: करोना फैलावतोय; प्रशासनाची धावाधाव

$
0
0
मुंबई: काही दिवसांपूर्वीच भारतात प्रवेश केलेल्या करोना विषाणूनं देशातील सर्वच राज्यात आपला विळखा घट्ट केला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून आतापर्यंत ३९ बाधित रुग्ण सापडले आहेत. मुंबईसह आसपासच्या परिसरात रुग्णांची संख्या १४ वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारची काळजी घेतली जात आहे. याबाबतच्या सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स: लाइव्ह अपडेट्स:

ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन

$
0
0
पुणे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचं मंगळवारी पुण्यात निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. यामध्ये 'खट्याळ सासू नाठाळ सून', 'माझा पती करोडपती', 'अशी ही बनवाबनवी', 'थरथराट', 'भुताचा भाऊ', 'दे दणादण', 'आयत्या घरात घरोबा', 'धुमधडाका', 'झपाटलेला' अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. विविध चित्रपटात त्यांनी साकारलेली वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची भूमिका विशेष ठसा उमटवणारी ठरली. जयराम कुलकर्णी यांचे सुपुत्र रुचिर हे वकील असून, अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी या त्यांच्या सून आहेत. दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत जयराम कुलकर्णी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे जयराम कुलकर्णी यांचे मूळगाव. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली. जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली होती.

‘फेडरल रिझर्व्ह’तर्फे व्याजात १ टक्का कपात

$
0
0
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : करोना विषाणूमुळे गाळात जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांनी पुढाकार घेऊन २०० अब्ज डॉलरचा निधी गोळा केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर घटवून ० ते ०.२५ टक्क्यांवर आणला आहे. तत्पूर्वी हा व्याजदर १ ते १.२५ टक्क्यांच्या आसपास होता. यापूर्वी फेडरल रिझर्व्हने तीन मार्चला व्याजदरांमध्ये ०.५ टक्क्यांची कपात केली होती. बँकेने आतापर्यंत व्याजदरामध्ये एकूण १.५० टक्क्यांची कपात केली आहे. या शिवाय बँकेने अर्थव्यवस्थेमध्ये ७०० अब्ज डॉलरची गुंतवणूक ओतण्याचाही निर्णय घेतला. पाचशे अब्ज डॉलर रोख आणि २०० अब्ज डॉलरच्या सरकारी बाँडची खरेदी करण्यात येणार आहे. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडच्याही मध्यवर्ती बँकेने आपत्कालीन बैठक बोलावून सोमवारी व्याजदरांमध्ये ७५ बेसिस पॉइंटची कपात केली. ब्रिटनकडून सर्वाधिक निधी विविध देशांतील सरकार आणि जागतिक संघटनांनी करोना विषाणूचा मुकाबा करण्यासाठी आपापल्या स्तरावर पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३६.८ अब्ज डॉलरचे पॅकेज ब्रिटनने जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ इटली (२८ अब्ज डॉलर) आणि संयुक्त अरब अमिरातने (२७.२ अब्ज डॉलर) पॅकेजची घोषणा केली आहे. देशांनी जाहीर केलेले पॅकेज
देश जाहीर पॅकेज (अब्ज डॉलरमध्ये)
ब्रिटन ३६.८
इटली २८
संयुक्त अरब अमिरात २७.२
जपान १९.६
ऑस्ट्रेलिया १७.६
सौदी अरब १३.३
थायलंड १२.७
जागतिक बँक १२
स्वित्झर्लंड १०.५
दक्षिण कोरिया ९.८
इंडोनेशिया ९.५
जगभरातील बँकांनी उचललेली पावले - बँक ऑफ इंग्लंड : व्याज दरांमध्ये अर्धा टक्क्यांची कपात, ब्रिटिश बँकांसाठी भांडवली गुंतवणुकीची मर्यादा घटवली. - पीपल्स बँक ऑफ चायना : प्राइम लँडिंग दरात ०.१० टक्के (एक वर्षासाठी), ०.०५ टक्के (५ वर्षांसाठी) कपात, रिव्हर्स रेपो ऑपरेशनमध्ये १७४ अब्ज डॉलरची भर. - युरोपीय मध्यवर्ती बँक : व्याजदरात कोणतेही बदल नाहीत, १३५ अब्ज डॉलर संपत्ती खरेदी करण्याची घोषणा. - बँक ऑफ कॅनडा : कर्जांवरील व्याजदरात ०.५ टक्के कपात. - रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलिया : व्याजदरात ०.२५ टक्के कपात. - सेंट्रल बँक ऑफ मलेशिया : ओव्हरनाइट व्याजदरात पाव टक्का कपात, एसएमईंसाठी ०.७ अब्ज डॉलरचा निधी गोळा.

'रेडमी नोट 9 pro' चा आज दुपारी पहिला सेल

$
0
0
नवी दिल्लीः शाओमीने नुकताच लाँच केलेला नवा स्मार्टफोन चा आज दुपारी १२ वाजता सेल सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यात शाओमीने हा स्मार्टफोन मॅक्स सोबत लाँच केला होता. Redmi Note 9 Pro हा तीन रंगात म्हणजेच ऑरोरा ब्लू, ग्लेशियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक रंगात उपलब्ध केले आहे. या स्मार्टफोनला ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पर्यायामधून खरेदी करता येवू शकणार आहे. Redmi Note 9 Pro चा आज सेल होणार असून Redmi Note 9 Pro Max चा येत्या २५ मार्च रोजी भारतात सेल होणार आहे. Redmi Note 9 Pro ची खास वैशिष्ट्ये रेडमी नोट ९ प्रोच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला अॅमेझॉन इंडिया, एमआय होम स्टोर्स, एमआय डॉट कॉम वरून खरेदी करता येऊ शकते. हा स्मार्टफोन ऑरोरा ब्लू, ग्लेसियर व्हाइट आमि इंटरस्टेलर ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध करण्यात येणार आहे. रेडमी नोट ९ प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याशिवाय या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि १६ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. रेडमी नोट प्रो मॅक्सप्रमाणे नोट ९ प्रोमध्येही ५०२० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या फास्ट चार्जिंगसाठी १८ वॅटचा चार्जर दिला आहे.

या ex-CJI चीही झाली होती राज्यसभेवर नियुक्ती

$
0
0
नवी दिल्ली : भारतीय राज्यव्यवस्थेत न्यायव्यवस्थेला राजकीय हस्तक्षेपापासून पूर्णपणे वेगळं ठेवत न्यायासाठी स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. त्यामुळे कोणतेही न्यायाधीश जेव्हा राजकारणाच्या संपर्कात येतात तेव्हा त्याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. चार महिन्यांपूर्वी निवृत्त झालेले सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामांकित केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पण माजी सरन्यायाधीशांना राज्यसभेवर पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही काँग्रेसने माजी सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. तर इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही अशीच घटना घडली होती. कोण होते रंगनाथ मिश्रा ? रंगनाथ मिश्रा हे २५ सप्टेंबर १९९० ते २४ नोव्हेंबर १९९१ या काळात सरन्यायाधीश राहिले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेत काँग्रेसचे खासदार राहिले. बहरुल इस्लाम यांच्यानंतर राज्यसभेत जाणारे ते दुसरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ठरले होते. इस्लाम यांनाही काँग्रेसनेच राज्यसभेवर पाठवलं होतं. रंगनाथ मिश्रा हे १९८४ च्या दिल्लीतील शिख दंगलीच्या चौकशी आयोगाचे एकमेव सदस्य होते. राजीव गांधी सरकारने या आयोगाची नियुक्ती केली होती. या अहवालात काँग्रेसला क्लीन चिट देण्यात आली होती. तसेच अहवाल हा पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला होता. इंदिरा गांधींकडून पहिल्यांदा नियुक्ती बहरुल इस्लाम हे सुप्रीम कोर्टातून नियुक्त होताच त्यांची राज्यसभेवर इंदिरा गांधी यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय न्यायव्यवस्थेतील ही अभूतपूर्व घटना होती. कारण, बहरुल इस्लाम हे १९५६ पासून काँग्रेसचे सदस्य होते. १९६२ आणि १९६८ ला दोन वेळा त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. पण आश्चर्यकारकरित्या त्यांनी १९७२ ला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते तत्कालीन आसाम आणि नागालँड (सध्याचे गुवाहटी) हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले. १९७९ ला ते आसाम हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्तीही बनले. १९८० ला ते निवृत्त झाले. पण निवृत्तीनंतरही त्यांची डिसेंबर १९८० मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा आश्चर्यकारक घटना होती. कारण, निवृत्त न्यायमूर्ती सहसा सुप्रीम कोर्टात नियुक्त केले जात नाहीत. १९८३ मध्ये त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसचे सदस्य म्हणून आसामच्या बारपेटा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. १९८४ मध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यामुळे त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, जस्टिस एम हिदायतुल्ला यांची निवृत्तीनंतर ९ वर्षांनी उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर माजी सरन्यायाधीश पी सदाशिवम यांची २०१४ मध्ये केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Viewing all 172726 articles
Browse latest View live




Latest Images